पिंपरी – महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत त्याचे काम शंभर टक्के पूर्ण होणार असून, 2 ऑक्टोबरला याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठीचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून दिव्यांगांवर उपचार करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे चार मजली दिव्यांग भवन उभारण्यात येत आहे. या भवनचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत त्याचे काम शंभर टक्के पूर्ण होणार असून, 2 ऑक्टोबरला याचे उद्घाटन करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्ष त्या इमारतीमध्ये हलविण्यात येणार आहे. या दिव्यांग भवनमध्ये विविध 14 प्रकारच्या तज्ज्ञांच्या वतीने दिव्यांगांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यालय, सभागृह, स्टाफ रूम, स्वच्छतागृह आदी सुविधा असणार आहेत. कामकाजासाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. डोळे तपासणी, भाषा संवाद रूम, संभाषण उपचार, समुपदेशन कक्ष, संगीत उपचार अशा वेगवेगळ्या केले जाणार आहेत. व्यावसायिक व उद्योग माध्यमातून दिव्यांग बांधवांवर उपचार, उपचारात्मक शिक्षण दिले जाणार प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र असणार आहे.
बांधकामासाठी 4 कोटी 68 लाख 41 हजार खर्च झाला. तर दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 3 कोटी 37 लाख 12 हजार खर्च केला आहे. दरम्यान, सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात भवनासाठी 12 कोटी 70 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरात साडेआठ हजार दिव्यांग
पिंपरी-चिंचवड शहरात 8 हजार 630 दिव्यांग बांधव आहेत. यामध्ये बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. या दिव्यांगांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध दिव्यांग कल्याणकारी योजनेंतर्गत दरमहा पेन्शन, व्यावसायिक प्रशिक्षण, अर्थसहाय्य आदी योजना राबविण्यात येत आहेत.
दिव्यांगांसाठीचा दिव्यांग भवनचा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दिव्यांगांवर उपचार करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून दिव्यांग बांधवांची उन्नती साधण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
-प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त