वडगाव मावळ – केशवनगर परिसरातील ग्रीन ग्लोरी सोसायटी जवळ असलेले विद्युत रोहित्र शुक्रवारी (दि. 10) जळाले. त्यानंतर तब्बल पाच दिवस शेकडो कुटुंबे अंधारात राहिली. महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी केशवनगर परिसरात असलेल्या ग्रीन ग्लोरी सोसायटी जवळील विद्युत रोहित्र जळाले. या रोहित्रामधून ग्रीन ग्लोरी, श्री हाईट्स, ग्रीन होम्स आणि इतर मोठ्या सोसायट्या आणि घरांना वीजपुरवठा केला जातो. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने तब्बल पाच दिवस येथील सोसायट्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यापर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पाणी न्यावे लागले. डोक्यावरून पाणी नेताना महिला व वृद्ध नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोरे जावे लागले. काही सोसायट्यांनी शेजारील सोसायट्यांकडून पैसे देऊन वीजपुरवठा जोडून घेत पाणी पुरवठा सुरु केला. मात्र अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांची जमिनीतील टाक्यांमधून पाणी भरण्यासाठी झुंबड उडाली. सकाळी पाणी भरण्याचे नवीन काम येथील नागरिकांना लागले होते. सध्या हिवाळा असल्याने सकाळी लवकर उजेडत नाही. तसेच वीजेवर गिझर, मिक्सर, फ्रिज आदी उपकरणे चालतात. या विद्युत उपकरणा अभावी स्वयंपाक करताना गृहिणींना अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेकांना कामावर लेट मार्क लागला. लाइट नसल्याने फ्रिजमधील अन्नपदार्थ खराब झाले. सध्या संपर्काचे प्रभावी माध्यम असलेला मोबाइल फोन देखील चार्ज करता आला नाही. अजूनही काही जणांना वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांना लॅपटॉप व इंटरनेटसाठी मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी जावे लागले. तसेच लाइट नसल्याने रात्रीच्यावेळी या भागात अंधार होता. येथील नागरिकांनी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरच्या कार्यालयाकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत होती. तब्बल पाच दिवस हा प्रकार सुरु राहिला. महावितरणकडून डीपी बदलण्यासाठी अक्षम्य विलंब झाला. लहान मुले, वृद्ध नागरिकांची या कालावधीत विशेष गैरसोय झाली. सतत पाच दिवस नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मंगळवारी (दि. 14) महावितरण कडून डीपी बसवण्यात आला. विद्युत रोहित्रावर जादा भार? केशवनगर येथील विद्युत रोहित्रावर क्षमतेपेक्षा जादा भार असल्याने तो वारंवार ना-दुरूस्त होतो. तसेच अधिकचा भार येत असल्याने विद्युत रोहित्रापासून सोसायटीला पुरवठा करणारी विद्युत वायर वारंवार जळून जाते. त्यामुळे विद्युत रोहित्र दुरूस्त करूनही केबल जळाल्यामुळे काही सोसायट्या अजूनही अंधारात आहेत. या भागासाठी आणखी एखादे विद्युत रोहित्र उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.