पिंपरी-चिंचवड : श्रेयवादाच्या लढाईत अडकलेली स्वस्त घरांची सोडत कधी?

पिंपरी – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. याची ऑनलाइन सोडत 11 जानेवारीला प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत ही सोडत ऐनवेळी रद्द करावी लागली.

महापालिकेच्या वतीने आयोजित 3 हजार 664 घरांसाठीची सोडत अचानक रद्द करण्यात आली. त्यासाठी तब्बल 47 हजार 801 जणांनी 5 हजारांच्या डीडीसह अर्ज भरला आहे. सोडत रद्द झाल्यामुळे हजारो नागरिकांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले. श्रेयवादाच्या लढाईमधून सोडत रद्द झाल्यानंतर दोन्हीही पक्षांनी आपआपली बाजू मांडत लवकरच सोडत घेणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राजशिष्टाचाराचे पालन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत लवकरच घेणार असल्याचे जाहीर केले. तर भाजपनेही त्वरित पुन्हा या घरांची सोडत काढणार असल्याचे जाहीर केले. मात्र या घटनेला 20 दिवस उलटून गेल्यानंतर अजूनही स्वस्त घरांची सोडत महापालिकेच्या वतीने काढण्यात आली नाही. त्यामुळे या स्वस्त घरांची सोडत कधी काढणार असा प्रश्‍न अर्जदार विचारत आहेत.

सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्‍न ताटकळत ठेवला जाणार नाही. पुढील आठवड्यात स्वस्त घरांची सोडत काढण्यात येईल. या घरांसाठी 47 हजार 801 जणांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी 3 हजार 664 घरांची सोडत काढली जाणार आहे.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.