पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि.२२) काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला. ऑक्टोबर २०२१ ला राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने डॉ. कैलास कदम यांची निवड पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी केली होती. तब्बल चार वर्ष शहराध्यक्षपद उपभोगल्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर कदम यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. सन २०१७ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. त्यानंतर २०२१ मध्ये कदम यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. काँग्रेस पक्षाचीच त्यांच्याकडे इतर पदे असल्याने त्यांना स्थानिक पातळीवर विरोध होत होता. तसेच एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने काँग्रेसमधील शहर पातळीवरील पदाधिकारी करत होते. मात्र, या चार वर्षांत त्यांनी एकाही पदाचा राजीनामा न देता निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे गरज असतानाच कदम यांनी हाता सोडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, कदम यांनी जरी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला, तरी काँग्रेसचे प्राथमिक सदस्य पदावर काम करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. माझे संघटन कौशल्य विचारात घेऊनच काँग्रेस पक्षाने माझ्यावर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पक्ष अडचणीत असताना सोपविली होती, तरी देखील मी पक्ष वाढीसाठी शंभर टक्के योगदान दिले आहे. मी आज फक्त काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य म्हणून यापुढेही मी काम करणार आहे असे कदम यांनी स्पष्ट केले आहे.