Pimpri Chinchwad Crime – सराईत गुंड सतत त्रास देत असल्याने एका टपरी चालक महिलेने गुरुवारी (दि. २९ जानेवारी) रोजी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेवर चिंचवड पोलीस ठाण्यात तर महिलेला त्रास देणाऱ्या गुंडावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुंड महिलेला खंडणीची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अनिता सागर लांडगे (वय ५०, रा. लांडेवाडी, भोसरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल मोनिका जरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी महिला पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आली. तिने सोबत ज्वलनशील पदार्थ असलेली बाटली आणली होती. ती आत्महत्येचा प्रयत्न करत असताना तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्यानुसार पोलिसांनी महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तिला एक गुंड सतत त्रास देत असल्याचे तिचे म्हणणे होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.महिलेच्या सांगण्यावरून तिला त्रास देणाऱ्या सचिन डॅनियल खलसे (वय ४०, रा. लांडेवाडी, भोसरी) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, महिलेची लांडेवाडी येथे नावाची पानटपरी आहे. आरोपी टपरीवर आला. त्याने सिगारेट आणि पाण्याची बाटली घेतली. त्याला घेतलेल्या सिगारेट आणि पाण्याच्या बाटलीचे महिलेने पैसे मागितले असता तो चिडून गेला. “तुला जर पानटपरी चालवायची असेल तर प्रत्येक महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझी टपरी जाळून टाकीन आणि तुला मारून टाकीन” अशी धमकी त्याने दिली. आरोपीने जबरदस्तीने ५०० रुपये खंडणी स्वरूपात घेतले. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.