- चिंचवड गावातील पाणी पुरवठा विस्कळीत
पिंपरी – निम्मा पावसाळा उलटून गेल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागात “रेन वॉटर हार्व्हेस्टिंग’ची आठवण झाली आहे. जलवाहिनीवरच बोअरवेल खोदल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. चिंचवडगाव येथे रविवारी (दि. 2) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
शहरात रस्त्यात ठिकठिकाणी बोअरवेल खोदण्याचे काम महापालिकेकडून सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. चिंचवड गावातील चापेकर चौक ते अहिंसा चौक (एल्पो चौक) दरम्यान हिंदूस्थान बेकरीजवळ महापालिकेने शनिवारी दोन ठिकाणी बोअरवेल खोदल्या. मात्र बोअरवेल खोदताना त्या ठिकाणाहून जलवाहिनी किंवा विद्युत वाहिनी गेली आहे की नाही, याबाबत खातरजमा केली नाही. त्यामुळे येथील जलवाहिनीवरच महापालिकेने शनिवारी बोअरवेल खोदली.
रविवारी सकाळी चिंचवडगाव परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र बोअरवेल खोदल्यामुळे येथील जलवाहिनी फुटली. यामुळे हा परिसरत जलमय होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले. चापेकर चौकाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते.
ही बाब लक्षात येताच पाणी पुरवठा विभागाने येथील जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद केला. तसेच तातडीने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र या प्रकारामुळे स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत “अ’ प्रभाग स्थापत्य विभागाचे अधिकारी सुशील लवटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठी अवघ्या 34 टक्क्यांवर आला आहे. गेल्या दहा वर्षांतील हा सर्वात निच्चांकी पाणीसाठा आहे. यामुळे शहरवासियांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमधून हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावर बोअरवेल खोदण्यापूर्वी स्थापत्य विभागाने तीन ते चार फूट मशिन ऐवजी हाताने खोदकाम केले असते, तर त्या ठिकाणी असलेली जलवाहिनी दिसून आली असती. सुदैवाने त्या ठिकाणी जलवाहिनी होती. जर भूमिगत उच्चदाब विद्युतवाहिनी असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
– सुनील अहिरे, अभियंता पाणी पुरवठा विभाग