पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बोगस सीबीएसई प्रमाणपत्राद्वारे शाळा चालविणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाकडून चालढकल केली जात आहे. या शाळेच्या बोगस दाखल्याचे बिंग फुटून दीड महिन्यांचा कालावधी उलटला. तरी देखील कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे या प्रकरणात “गौडबंगाल’ झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आपल्या मुलांना सीबीएसईच्या शाळांमध्ये घालण्याचा पालकांचा कल पाहून राज्य शिक्षण मंडळाच्या अनके शाळांनी सीबीएसईची मान्यता घेतल्या आहेत. मात्र काही शिक्षण संस्थांनी सीबीएससीची मान्यता न घेता बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शाळा सुरू केल्याची बाब उघडकीस आली होती. पुण्यातील एम. पी. इंटरनॅशनल स्कुल ऍण्ड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कुल ऍण्ड ज्युनियर कॉलेज आणि पिंपरी-चिंचवडमधील क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कुल या शाळांची चौकशी करण्यात आली. या तीन शिक्षण संस्थानी अशी बोगस प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या बोगस शाळांवर कायदेशील कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले. मात्र, आजतागायत पिंपरी-चिंचवडमधील बोगस शाळेवर कारवाई झालेली नाही.
सीबीएसईचे बोगस प्रमाणपत्र प्राप्त करुन पिंपरी-चिंचवडमधील क्रिएटिव्ह शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पालकांना गंडा घातला. असंख्य पालकांनी शाळेत पाल्यांना प्रवेश घेऊन लाखो रुपयांची रक्कमही भरली. शेवटी शाळा बोगस असल्याचे आढळून येताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. या संस्थेकडून शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा “खेळ’ मांडला आहे. त्यामुळे या शाळेवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य पातळीवरून देण्यात आले. तरी देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे संबंधित बोगस शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात काहीतरी गौडबंगाल झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष धोकादायक
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या शाळेला पाठीशी घालण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आणि तितकाच धोकादायक असल्यामुळे पालकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. शहरातील सर्वच्या सर्व शाळांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. या मागणीकडे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे दूर्लक्ष आश्चर्यचकीत करणारे ठरत असल्याने आता या प्रकरणी काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
क्रिएटिव्ह शिक्षण संस्थेच्या बोगस प्रमाणपत्राची माहिती समोर आली आहे. त्यानुसार संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. आज संस्थेवर कारवाई होईल.
-संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग