पिंपरी (प्रतिनिधी) – लोणावळा ते पुणे दरम्यान आता दुपारच्या वेळेतही लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून (दि.15) दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय बोर्डाने घेतल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. रेल्वे सुरू होणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.
कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन बंद होते. साडे दहा ते अडीच या वेळेत लोकल सेवा बंद होती. दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील संसदेत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. लोणावळा ते पुणे दरम्यान सोमवारपासून लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. दुपारच्या वेळेत सुरू होणे हे सर्वांचे यश असल्याचे बारणे म्हणाले.