पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या आरक्षण सोडतीमध्ये दोन प्रभागांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल करण्याच्या सूचना दिल्या. हा बदल केल्यानंतर महापालिका प्रशासनाला प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रभाग क्रमांक ३० मधील नाराज इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी (दि. १८) महापालिका भवनावर मोर्चा काढला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमधील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबसी) आणि महिलांसाठीच्या राखीव जागांची सोडत ११ नोव्हेंबरला झाली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आयोगाने शहरातील दोन प्रभागांमध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी थेट पद्धतीने महिलेसाठी जागा देणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाकडून त्याठिकाणी सोडत काढण्यात आली. त्यामुळे ती रद्द करून दोन प्रभागांमध्ये बदल करण्यात आला असून चार जागांवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे प्रभाग ३० मधील इच्छुकांनी निवडणूक विभागात येत गोंधळ घातला. त्यांना उपायुक्त सचिन पवार यांनी कागदपत्रे दाखवत माहिती दिली. यावेळी ११ नोव्हेंबरचे आरक्षण कायम ठेवा अन्यथा आम्हाला आणखी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. सूचना आणि हरकती नोंदवत आम्ही न्यायालयात लढा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ‘निवडणूक आयोगाने हरकती व सूचना घेण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे यावर नागरिक हरकती घेऊ शकतात. जो काही बदल केला आहे, तो राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आला आहे. त्याबाबतचे आयोगाचे आदेश देखील सर्वांसाठी उपलब्ध आहेत.’ – सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग.