Pimpri : आयुक्तांच्या बदलीनंतर कुदळवाडीत जल्लोष

पिंपरी – महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची मंगळवारी बदली झाली. त्यानंतर कुदळवाडी परिसरात अनोखे चित्र पाहायला मिळाले. स्थानिक व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
फेब्रुवारी महिन्यात महापालिकेने कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोठी मोहीम राबवली होती. सुमारे ९८० एकरांवर पसरलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवले. या कारवाईत शेकडो गाळे, गोदामे आणि व्यावसायिक जागा जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध करत ती अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.
या मोहिमेमुळे व्यापारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यामुळे शेखर सिंह यांच्या बदलीची बातमी समजताच अनेक व्यापाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी काही व्यापाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. तर आमच्यावर अन्याय झाला असून हा अन्याय करणाऱ्या प्रशासकांची बदली झाली हे योग्य झाले असल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली.
सोशल मीडियावर पोस्ट्स
बदलीच्या बातमीची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन कुदळवाडी चौकात फटाके फोडले. तर शहरातील पर्यावरणप्रेमींनी तसेच हरित सेतूला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सोशल मीडियावर टिका केली. काहींनी अनेक मीम्स तयार करून ते सोशल माध्यमावर टाकले.





