पिंपरी: हैद्राबादच्या डाॅक्टरांचा हलगर्जीपणा, महिलेच्या पोटात ठेवला चक्क काॅटनचा माॅब

पिंपरी – मूल पोटातच मृत झाल्यामुळे हैद्राबाद येथील शासकीय रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात मोठा मॉब (कापसाची पिशवी) राहिला. मात्र ती महिला पिंपरी चिंचवडला आल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी निदान केल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करीत जवळपास तब्बल ३० चौरस सेंटीमीटरचा मॉब पोटातून काढला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आकुर्डी येथील एक २४ वर्षीय महिला आपल्या पतीसोबत हैद्राबाद येथे राहत होती. ती नऊ महिन्यांची गरोदर असताना बाळ पोटातच वारले. त्यामुळे हैद्राबाद येथील निलोफर या शासकीय रुग्णालयात २२ मे रोजी तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यावर ती आकुर्डी येथे आपल्या माहेरी आली.
मात्र तिचे पोट दुखत असल्याने स्थानिक डॉक्टरांनी तिला गोळ्या दिल्या. मात्र पोटदुखी न थांबल्याने त्या जवळच्या खासगी रुग्णालयात गेल्या. तिथे सोनोग्राफी केल्यावर पोटात काहीतरी असल्याचे दिसून आले. पोटात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोटाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी तिच्या पोटात मॉब असल्याचे दिसून आले.
त्या महिलेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ती आकुर्डी रूग्णालयात गेली. मात्र त्यांनी पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले. २२ जून रोजी ती महिला बाह्य रुग्ण विभागात आली. तेथील डॉक्टर बालाजी धायगुडे, डॉ. संतोष थोरात यांनी वायसीएमचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे यांना सांगितले.
महिलेच्या प्रकृतीला धोका असल्याने त्याच दिवशी रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉक्टरांनी तिच्या पोटातून ३० चौरस सेंटीमीटर आकाराचा कॉटनचा मॉब पोटातून काढला. या शस्त्रक्रियेच्या वेळी भूलतज्ज्ञ डॉ. मनिष सपाटे व स्वप्ना काळे यांनी प्रमुख भूमिका बजावली. तसेच डॉ. अक्षय म्हसे यांनी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.
“शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव थांबवा व बाळाने पोटात केलेली घाण काढण्यासाठी या मॉबचा वापर केला असावा. मात्र शस्त्रक्रियेनंतर तो मॉब पोटातून काढण्यास तेथील डॉक्टर विसरले. त्यामुळे त्या महिलेला पोटदुखीचा त्रास झाला. महिनाभर हा मॉब पोटात राहिल्याने तो पोटातील लहान आतड्यांना चिकटल्याने ती आतडी फाटली होती. लहान व मोठी आतडी आम्ही व्यवस्थित केली. आता ती महिला सुखरुप आहे. मात्र तेथील डॉक्टरांचा निष्काळजीपणा त्या महिलेच्या जिवावर बेतला असता.”- डॉ. संतोष थोरात, सर्जन, वायसीएम रुग्णालय





