Pimpri : बीज सोहळ्यासाठी कामाची लगबग

देहूगाव : संत तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (दि.१६ मार्च) पार पडणार असून याअनुषंगाने आयोजित विविध कार्यक्रम व त्यापार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रत्येक विभागाने भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी आपापल्या कामाचे नियोजन करून जबाबदारीने ते पार पाडावे, अशा सूचना तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिल्या.
तहसीलदार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्ष पूजा दिवटे यांसह देवस्थान संस्थानचे विश्वस्त, विविध विभागाचे अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र देहूत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पदपथांवरील अतिक्रमण हटवावे, संपूर्ण रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, चाकण, तळेगाव, पुणे मनपा, स्वारगेट आदी ठिकाणी जाण्यासाठी थेट देहूतून बस सुरू कराव्यात. एसटी महामंडळाच्या पंढरपूर, तुळजापूर व इतरत्र जाणाऱ्या बसेस देहू मार्गे जाव्यात आदी सूचना विश्वस्तांनी केल्या.
नगरपंचायतीकडून केली जाणारी पथदिवे दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छता, शौचालय व्यवस्था, पाणी व्यवस्था, महिला सुरक्षा याचा माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आरोग्य केंद्र, तेथील व्यवस्था, आरोग्य तपासणी केंद्र व आवश्यक सुविधा यांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच अखंड वीजपुरवठा व विद्युत कर्मचारी सेवा याबद्दल महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
वाहतूक कोंडीची समस्या न व्हावी, यासाठी रस्ते दुरुस्ती, रस्ता रुंदीकरण व वाहतूक पोलिसांचे नियोजनाचा आढावा घेण्यात आला. सोबत कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षा व चोख पोलीस बंदोबस्त याबाबत पोलीस बंदोबस्त व नियोजनाची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दौरे
संत तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. रविवारी (दि.१६ मार्च) रोजी होणाऱ्या बीजोत्सवाच्या अनुषंगाने राज्यभरातील भाविक वारकरी, देहूत जमा होणार आहेत. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. १४ मार्च) तर, रविवारी (दि. १६ मार्च) बीज सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर्शनार्थ येणार आहेत.





