Pimpri : शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यासाठी शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७० हजार पुस्तकांची मागणी केली होती. शासनाकडून महापालिकेला पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून शाळांना पुस्तकांचे गड्ढे वितरित करण्यात येत आहे.
यंदा १६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शहरातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत. शालेय साहित्य खरेदी करण्याची महापालिका शिक्षण विभागाची लगबग सुरू आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने हे नियोजन केले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.
त्यानुसार बालभारतीने पुस्तकांची छपाई केली. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारती कडून पिंपरी, आकुर्डी उन्नत केंद्रावर पुस्तके दाखल झाली आहेत. शाळेत विद्यार्थी आल्यावर त्यांचे स्वागत नवी पुस्तके देवून केले जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्यांनी सांगितले.





