Pimpri : ग्रामसेवकाच्या प्रतीक्षेत भाजे ग्रामपंचायत

कार्ला : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीत मागील दोन महिन्यापासून ग्रामसेवक नसल्याची परिस्थिती आहे. भाजे गावचे ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी नारायण दौंडकर ह्या रजेवर गेल्याने त्यांच्या जागी नव्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, परंतु संबंधित अधिकाऱ्याने पदभार न स्वीकारल्याने भाजे ग्रामपंचायतीत दोन महिन्यापासून ग्रामसेवक नाही. परिणामी ग्रामपंचायतीची व गावकऱ्यांची अनेक कामे खोळंबली असून संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन मंगळवार (दि.१५) पर्यंत ग्रामसेवक द्या अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
भाजे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी नारायण दौंडकर या दिनांक १० फेब्रुवारी २०२५ पासून वैद्यकिय कारणास्तव रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे भाजे गावचा अतिरिक्त कार्यभार वेहेरगाव गावचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश राजू आंबेकर यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु त्यात अंशतः बदल करून भाजे गावचा अतिरिक्त पदभार मळवली गावच्या ग्रामपंचायत अधिकारी पुनम सुर्यवंशी यांच्याकडे देण्याबाबतचा आदेश गटविकास अधिकारी के.के. प्रधान यांनी २५ फेब्रुवारी रोजी दिला होता.
सुर्यवंशी यांनी मळवली गावचा पदभार सांभाळत असताना भाजे गावचा पदाभार पाहायचा होता व मोहिनी दौंडकर यांच्याकडून पदभार स्वीकारायचा होता. परंतु पुनम सुर्यवंशी यांनी अद्याप भाजे ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला नाही.
ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा
दरम्यान, मोहिनी दौंडकर या रजेवर गेल्यापासून भाजे गावाला ग्रामपंचायत अधिकारी उपलब्ध नसल्याने, तसेच दौंडकर यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर लवकर हस्तांतरीत न केल्याने आजपर्यंत गावकऱ्यांची अनेक कामे रखडली आहे. संतप्त गावकऱ्यांनी ‘ग्रामसेवक हरविले’ असल्याची भावना व्यक्त करीत गटविकास अधिकारी के. के. प्रधान यांच्याकडे ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची विनंती केली आहे. अन्यथा मंगळवार नंतर वडगावात पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतीला ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना विविध दाखले देता येत नाही. अनेक नागरिक कर भरण्यासाठी येत आहेत, परंतु ग्रामसेवक हजर नसल्याने कर भरणा होत नाही.
– प्रिया ओव्हाळ, सरपंच, भाजे
आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जणू हरविले आहेत. गटविकास अधिकारी यांना अनेकवेळा निवेदन देऊनही गावाला ग्रामसेवक मिळाले नाहीत. बीडीओंनी आदेश काढूनही ग्रामसेवक रुजू होत नाही. मंगळवारपर्यंत ग्रामसेवक न आल्यास आम्ही उपोषण करणार आहोत.
– विकास वाल्हेकर, उपसरपंच, भाजे
गटविकास अधिकारी यांनी भाजे ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. परंतु माझी तब्येत ठीक नसून लवकरच मी रजेवर जाणार असल्याने पदभार स्वीकारलेला नाही.
– पुनम सुर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी, मळवली





