पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्व.ित्रक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक धक्कादायक घडामोडी पहावयास मिळाल्या. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष बापू कातळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश कार्यक्रम पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि मावळ खासदार श्रीरंग बारणे यांचे उपस्थितीत पार पडला. बापू कातळे यांच्या या निर्णयामुळे प्रभाग १६ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. बापू कातळे यांचे पत्नी रेश्मा बापूजी कातळे यांना महिला सर्वसाधारण गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. या राजकीय घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये आगामी निवडणुकीत रंगत वाढणार आहे. या वेळी बोलताना बापू कातळे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात प्रभाग १६ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ताकदीने काम करू.” शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिकाऱ्यांनीही कातळे व त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभेत पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.