Pimpri : महिला पोलिसाच्या सतर्कतेमुळे बांगलादेशी महिलेला अटक

पिंपरी : एक बांगलादेशी महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात आली. मात्र तेथील महिला पोलिसाला संशय आल्याने तिने याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या चौकशीत ती महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.
शहनाज हलीम चौधरी (वय २९, सध्या रा. जे. एम. हाईटस्, नेहरूनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या माहिलेचे नाव आहे. अरोपी शहनाज हिने पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला होता. पोलीस पडताळणीसाठी हा अर्ज पिंपरी पोलीस ठाण्यात आला होता. तेथे पोलीस पडताळणीचे काम सुरू असताना शहनाजबाबत तेथील महिला कर्मचारी हिला संशय आला. तिने याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला सांगितले.
दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी संशयित महिलेकडे चौकशी केली. तिला भारताबाबत माहिती विचारली. मात्र ती माहिती देऊ शकली नाही. पोलिसांनी तिचा मोबाइल तपासला असता त्यात बांगलादेशात फोन केल्याचे दिसून आले.
तसेच सोशल मीडियावर तिच्या बांगलादेशी मैत्रिणी असल्याचे दिसून आले. तिच्या कागदपत्राची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे दिसून आले. त्यानुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





