Pimpri : मंगलमय वातावरण, खरेदीचा उत्साह अन् दिवाळीची धूम

पिंपरी – दिवाळीच्या मुख्य पर्वांपैकी एक असलेले लक्ष्मीपूजन शहरात मंगळवारी (दि. २१) अतिशय उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडले. सकाळपासूनच बाजारपेठा फुलबाजार, सराफा पेढी, इलेक्ट्रॉनिक दुकाने, तसेच कपड्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. दिवसभर खरेदीचा उत्सव सुरू असतानाच संध्याकाळी शहरातील प्रत्येक घर, दुकान आणि कार्यालय देवी लक्ष्मीच्या पूजनाने उजळून निघाले.
घराघरांत देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांच्या प्रतिमांची सजावट करून, कुटुंबांनी एकत्र येऊन पूजन केले. पूजनासाठी अनेक घरांमध्ये पुरणपोळीचा नैवैद्य करण्यात आला. तसेच फराळांचे पदार्थ करण्यासाठी देखील गृहीणींची लगबग सुरू होती. महिलांनी पारंपरिक साड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये सजून सुंदर रांगोळ्या काढल्या. अनेक ठिकाणी महिलांनी फुलांची तोरणे आणि दिव्यांच्या सजावटीने घराच्या दारांना आकर्षक रूप दिले. तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लहान मुलांनी फटाके फोडून दिवाळीचा आनंद दुप्पट केला.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये पिंपरी चौक, भोसरी, निगडी, चिंचवड स्टेशन परिसर, आकुर्डी, तसेच रहाटणी येथे रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगला होता. व्यापारी संकुलांमध्येही सामूहिक लक्ष्मीपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक सामाजिक संस्थांनी दिवाळी फराळ वाटप करून सामाजिक उपक्रम राबवले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर शहरातील दुकानांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. तर सायंकाळी लक्ष्मी पूजनाने परिसरामध्ये धूप, अगरबत्तीचा सुवास दरवळला होता. एकूणच, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत शहरातील नागरिकांनी लक्ष्मीपूजनाचा उत्सव जल्लोषात साजरा केला. शहरभर आनंद, प्रकाश आणि भक्तीभावाचे वातावरण दाटून आले होते.
सराफा पेढीला झळाली
दिवाळीच्या शुभमूहर्तावर अनेकांनी सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारापेठांमध्ये असलेल्या सराफा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचा दर १ लाख १५ हजार रुपयांपर्यंत होता.
कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी
दिवाळीसाठी अनेकांनी नवीन वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये देखील नागरिकांची मोठी गर्दी होती. दिवाळीचे औचित्य साधत अनेक शोरुम मालकांनी विविध सवलती दिल्या होत्या. या सवलतींचा लाभ घेत नागरिकांनी बंपर खरेदी केली. तर दिवाळीसाठी नवीन कपड्यांना देखील चांगली मागणी असते. त्यामुळे कापड बाजारात चांगली तेजी होती. साड्या, कुर्ते व पारंपारिक कपडे खऱेदी करण्यासाठी नागरिकांनी कापड बाजारामध्ये गर्दी केली होती.
गिफ्ट अन् फराळाचा आस्वाद
दिवाळीमध्ये एकमेकांना गिफ्ट देण्याचा नवीन ट्रेंड येत आहे. त्यानुसार अनेकांनी घरात उपयोगी वस्तू, मिठाई, ड्रायफ्रूट्स यांना आकर्षक पॅकिंग करून एकमेकांना गिफ्ट दिले. तसेच अनेकांनी आप्तेष्ठ, मित्र परिवार यांच्याकडे जात फराळाचा आस्वाद घेत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.





