लोणावळा : शहरातील जयचंद चौक येथे एका व्यक्तीने अल्पवयीन शाळकरी मुलीला चॉकलेट व फ्रूटीचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदार व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरोपीने मुलीचा हात धरून जबरदस्तीने तिला दुकानात नेले व तिला चॉकलेट आणि फ्रुटी देत आपल्या सोबत येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी दुकानदार व इतरांनी आरोपीला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले व हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आरोपी श्रीपती महादेव गायकवाड (रा. चिखली, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहितेची विविध कलमे व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश भिसे घटनेचा पुढील तपास करत आहेत.