पिंपरी – महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आचारसंहितेचे पालन करण्यासाठी शहरात लागलेले फ्लेक्स, बॅनर काढायला सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेपर्यंत ४ हजार ८१९ नियमबाह्य तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलक, भिंतीवरील राजकीय जाहिराती आदी बाबी हटविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशांचे पालन करण्यासाठी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय इमारतींच्या परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत, नियमबाह्य जाहिरात फलक, फ्लेक्स आदी बाबी हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. ही कारवाई करताना संबंधित राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेला सहकार्य करावे, तसेच पुढील काळात कोणत्याही स्वरूपात आचारसंहितेचा भंग होईल असे साहित्य लावू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत, यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने ही कारवाई करण्यात येत असून, पुढील काळातही यात सातत्य सुरू राहणार आहे.’ – राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका