Pimpri : राजगुरुनगर विभागात नवीन वीज जोडण्यांत दिरंगाईचा आरोप

पिंपरी : महावितरण पुणे परिमंडळ अंतर्गत असलेल्या राजगुरुनगर विभागात नवीन वीज जोडणी कामात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने केला आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करुनही कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे. याआरोपांचे महावितरणकडून खंडन करण्यात आले असून याबाबत चौकशी करुन असे काही झाले असल्यास कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
वीज कंपनीने नवीन वीज जोडण्यासाठी एनएससी स्कीम सुरू केली असून, त्याअंतर्गत वीज जोडणी अर्जदाराला सर्व कामे महावितरण करून देत असते. मात्र महावितरण अधिकार्यांच्या ‘काही बाबी’ ऐकल्या नाही की अनेक महिने जोडणी दिली जात नसल्याचे प्रकार राजगुरुनगर विभागीय कार्यालयांतर्गत सुरू असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
वीज कंपनीने एमपॅनेलमेंट एजन्सी नेमल्या असून, त्यांना हाताशी धरून काही विशिष्ट ग्राहकांनाच पंधरा दिवस ते एक महिन्यांत वीज जोड दिला जात आहेत. याबाबत संबंधित कार्यकारी अभियंत्यांना विचारणा केली तर ते अरेरावीची भाषा वापरतात. तसेच कार्यालयात संघटना प्रतिनिधींना अपमानित करत असल्याचा आरोप देखील संघटनेने केला आहे.
वीज जोडणी अर्ज आणि त्याचे प्रत्यक्षात झालेले काम याबाबत एनएससी कामांची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी केल्यास याबाबतचेे सत्य बाहेर येऊ शकेल असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. या कामांत अनियमितता असून, कार्यकारी अभियंता यांच्या वर्तणुकीची माहिती वरिष्ठ कार्यालयांना देऊनही सुधारणा होत नसल्याने पुढील काही दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नवीन वीजजोडकरिता अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर विहित कालावधीत कार्यवाही करणे बंधनकारक आहे. मात्र, राजगुरुनगर कार्यालयाकडून या नियमांचे पालन होत नसल्यास त्याची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.
– युवराज जरग
अधीक्षक अभियंता,
महावितरण, पुणे परिमंडल





