– प्रकाश गायकर पिंपरी -पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अलगद बाजूला ढकलले आहे. स्थानिक पातळीवर पारंपारिक शत्रू असल्याने शहरामध्ये हे दोन्ही पक्ष वेगळेच लढणार हे जवळपास निश्चित होते. भाजप आणि राष्ट्रवादीचा सामना रंगण्याचे चित्र असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डाव टाकला आहे. शहरामध्ये एक खासदार असलेल्या शिवसेनेलाच सोबत घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. शहरामध्ये भाजपाचे चार आमदार आहेत. तसेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाने ७७ जागा मिळवत दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर राज्यामध्ये एकत्र नांदत असलेल्या महायुतीच्या पक्षांना निवडणुकीसाठी एकत्र घेत महाविकास आघाडीला सामोरे जाणे परवडणारे नाही. तसेच यामधून जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण होईल. गतवेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीने ३६ जागी यश मिळवले होते. मात्र, सुमारे ४५ हून जास्त जागा अशा होत्या, तिथे राष्ट्रवादीने दोन क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे त्याठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करणे स्वभाविक आहे. ६० हून अधिक जागांवर राष्ट्रवादीने दावा केल्यास शिवसेनेला किती आणि भाजपच्या वाटाल्या किती जागा येणार हा प्रश्नच होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील स्थानिक पदाधिकारी स्वबळावर ठाम होते. त्याबाबत आधीच त्यांनी अजित पवार यांची भेट घेत स्वबळावर का लढायचे याचे मंत्र अजितदादांच्या कानात फुंकले होते. आता पुणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी शहरामध्ये भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेला ५ जागा देत आरपीआय पक्षाच्या तीन जागा कमळावर लढवत स्वतः १२१ जागांची तयारी केली होती. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिक जागांची मागणी केली होती. हीच सल लक्षात घेत अजित पवार यांनी डाव टाकला आहे. शिवसेनेलाच २५ जागा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र लढण्याची तयारी केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. किंबहुना शहरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच शिंदे यांनी हा पर्याय पुढे आणला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या समीकरणामुळे भाजपच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. बालेकिल्ला मिळविण्यासाठी अजितदादांचा मायक्रो प्लॅन पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१७ साली भाजपाने जोरदार मुसंडी मारत ७७ जागा यश मिळवले. २०१२ च्या निवडणुकीमध्ये अवघे ३ नगरसेवक असलेल्या भाजपचा हा षटकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागला. अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विजयाचा वारु रोखण्यासाठी अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. खुद्द अजित पवार यांनीच लक्ष घातले असून प्रभागांमध्ये तीन सर्व्हे झाले आहेत. तर, इतर पक्षांमधील नाराजांना अचूक हेरून पक्षात येण्यासाठी आवतान धाडलं जात आहे. पवारांच्या या मायक्रो प्लॅनिंगने भाजपाला निवडणूक कठीण जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काहींची महायुतीच्या बाजूने भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत न लढण्याचा घेतलेला निर्णय पक्षातीलच काहींना पटलेला नाही. राज्यामध्ये मांडीला मांडी लावून बसले असताना शहर पातळीवर आमच्या झुंज लावली जात असल्याची चर्चा काही माजी नगरसेवक करत आहेत. त्यांच्यामते जागांबाबत थोडी नरमाईची भूमिका घेत महायुतीमध्येच लढले पाहिजे जेणेकरून सत्ता आलीच तर काही पदांचा लाभ घेता येईल. आगामी काळात या नारांजाचा सूर काय येतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.