पिंपरी – शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील राजकीय गणिते बदलली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना गळाला लावले आहे. भाजपचे गणेश लंगोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील विशाल काळभोर यांनी मंगळवारी (दि. २३) अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून आणखी एक मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली. तर प्रभाग ३१ मधील भाजपाचे माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल उपस्थित होते. या प्रवेशामुळे भाजप आणि शरद पवार गटाच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रभागात राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. अजित पवार यांनी शहरात पॅनलवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, प्रभागात चार तगड्या उमेदवारांचे पॅनल करत भाजपाल शह देण्याची तयारी पवार यांनी केली आहे.