Pimpri : रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमीन निकामी

खालापूर : तालुक्यातील लोहप – तळवली गावच्या हद्दीत एक खासगी कारखाना गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. एकीकडे या कारखान्यात उत्पादन तयार होत असताना निर्माण होणाऱ्या काळ्या धुराने आणि तीव्र वासाने नागरिक हैराण झालेले असताना, आता कारखान्यातील रसायनयुक्त पाण्याचाही नागरिकांना सामना करावा लागत आहे.
नियमांची पायमल्ली करून सदर कारखान्यातून रसायनयुक्त पाणी जवळील कालव्यात सोडले जाते. हे दूषित पाणी जवळील शेतीत पसरून शेती नापीक होत चालली आहे. जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत असून यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर केवळ दिखावा म्हणून एक दोन दिवस पाणी बंद होते, परंतु नंतर परिस्थिती जैसे थे होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे शेतकरी नागरिक हवालदिल झाले आहेत.
हा कारखाना स्थापन झाल्यापासून कारखान्यातील धूर आणि वायूमुळे नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे वायू प्रदूषण होत असताना आता स्थानिकांना पाणी प्रदूषण व शेतजमिनी निकामी होण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा आवाज उठविला, मात्र त्यांचीच समजूत काढून आवाज दाबण्याचे काम केले जाते. आजतागायत दूषित पाण्याबाबत प्रशासन, संबंधित विभागाने ठोस कारवाई न केल्याचा आणि कारखान्यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
खालापूर तालुक्यात सर्वाधिक प्रदूषण करणारा हा कारखाना आहे. कारखान्यात उत्पादन तयार होताना निर्माण होणाऱ्या धूराने परिसरातील नागरिक हैराण झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आधीच निर्माण झालेला असताना, आता कारखान्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमीन निकामी होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारखान्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
– भरत पाटील, शेतकरी





