Pimpri : मावळमधील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर

पवन मावळ : महाराष्ट्र शासन कृषि विभागातील क्षेत्रीय स्तरावर असणारा महत्वाचा घटक म्हणजे कृषि सहाय्यक. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारा कृषि विभागातील कर्मचारी. परंतू मागील दहा वर्षांपासून कृषि सहाय्यक आपल्या काही मागण्या शासन दरबारी मांडत आहेत, ज्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील सर्व कृषि सहाय्यकांनी बेमुदत संप पुकारला आहे.
कृषिसेवक तीन वर्षाचा कालावधी रद्द करणे, ऑनलाइन काम करण्यासाठी लॅपटॉप मिळावा, कृषि सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे, ग्रामस्तरावर मदतनीस मिळणे, निविष्टा वाटपाचे मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही व्हावी, नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्याची कार्यपद्धती तयार करण्यात यावी, आकृतिबंध तत्काळ मंजूर करण्यात यावा, या कृषि सहाय्यकांच्या मागण्या असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना पुणे शाखेचे प्रतिनिधी विकास गोसावी यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील सर्व कृषि सहाय्यक बेमुदत संपात सहभागी आहेत. कृषि सहाय्यकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत संप चालू राहणार आहे. शासनाने तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनचे मावळ तालुका अध्यक्ष घनश्याम दरेकर यांनी सांगितले.





