Pimpri : संतपीठात सोडत पद्धतीने ३८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित चिखली येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठात ३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश सोडत काढून निश्चित करण्यात आले आहेत.
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, पाटीलनगर टाळगाव चिखली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये सिनिअर के.जी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या उर्वरित जागांच्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्धारित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीने अर्ज आल्याने ही प्रक्रिया व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार सोडत पद्धतीने अतिशय पारदर्शी वातावरणात पार पडली. या वेळी संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक आदींसह संतपीठ कर्मचारी व पालक उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये सिनिअर के.जी ते इयत्ता सातवी वर्गासाठी आलेल्या एकूण २६० अर्जांपैकी सर्व नियमात बसणारे ८४ प्रवेश अर्जांमधून सोडत काढण्यात आली. यामध्ये एकूण ३८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सिनिअर के.जीच्या ५, पहिली १०, दुसरी ३, तिसरी २, चौथी २, पाचवी ५, सहावी ३, सातवी १ अशा विद्यार्थ्याचा समावेश आहे.





