प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चाकाखाली डोके आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ९) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास डोंगरवस्ती, निघोजे येथे घडला.गिरीश एकनाथ कोठावदे (वय ४९) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हाकानी करीम शेख (वय ३६, रा. खालुंब्रे, ता. खेड, मूळ रा. कंधार, जि. नांदेड) आणि दुचाकीस्वाराचा मृत्यू घडवणारा अज्ञात वाहन चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत रमन कोतकर (वय ४७, रा. मोरया गोसावी राज पार्क, केशवनगर, चिंचवड, मूळ रा. चाळीसगाव) यांनी मंगळवारी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हाकानी शेख याने ताब्यातील आयशर ट्रक (एमएच १४ सीपी ८१२१) कोणतेही रिफ्लेक्टर न लावता रस्त्यावर धोकादायक प्रकारे उभा ठेवला होता. त्याचवेळी दुचाकीस्वार गिरीश कोठावदे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना ट्रकला धडक बसली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले. डोक्यात हेल्मेट असूनही मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या भीषण दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.