Pimpri : बेंन्च खरेदीच्या निविदेची सखोल चौकशी करावी

पिंपरी : महापालिका भांडार विभागाने शाळांसाठी आवश्यक बेंच खरेदीसाठी राबविलेली निविदा ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आली. प्रशासनाच्या चुकांमुळे ही निविदाप्रक्रिया आठ महिन्यांपासून रखडली आहे. या निविदेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहूल कोल्हटकर यांनी केली आहे.
या संदर्भात कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. त्यानुसार, शाळांसाठी बेंन्च खरेदी निविदेतील त्रृटीबाबत काही मुद्दे मांडूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.
त्यातच भांडार विभागाकून ही निविदाप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. काही मर्जीतील ठेकेदारांना पात्र करण्यासाठी या निविदेत अटी-शर्ती टाकल्याचा संशय निर्माण झालेला आहे. तसेच, यामध्ये पात्र झालेल्या काही कंत्राटदारांनी बनावट, खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याची शंका देखील उपस्थित झालेली आहे.
या संदर्भात कोणतीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही निविदा तातडीने रद्द करून नव्याने राबवावी आणि या निविदेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हटकर यांनी केली आहे.





