Pimpri : संस्थेच्या विकासाचा नवा टप्पा सुरू होणार – बाळा भेगडे

नूतनच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी बाळा भेगडे, सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड
तळेगाव दाभाडे – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात गुरूवारी (दि. ३०) पार पडली. या सभेत संस्थेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.
सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी नंदकुमार शेलार, खजिनदारपदी राजेश म्हस्के, तर सहसचिवपदी विनायक अभ्यंकर यांची निवड करण्यात आली. सोबतच संचालकपदी गणेश खांडगे, रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, यादवेंद्र खळदे तर सल्लागार मंडळात दामोदर शिंदे, महेश शहा, सोनबा गोपाळे, वसंत भेगडे आणि शंकर नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे.
सभेत संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन करताना, संस्थेची उत्तरोत्तर प्रगती ही सर्वांच्या सहकार्यानेच शक्य आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
सचिव संतोष खांडगे यांनी संस्थेच्या २४ कार्यरत शाखांचा प्रगती अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संतोष खांडगे यांनी केले, तर आभार सहसचिव विनायक अभ्यंकर यांनी मानले.
सभेला संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या कार्यकारिणीमुळे संस्थेचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.





