Pimpri : ‘नकोशी’ शाळा बनली ‘हवीहवीशी’

पिंपळे गुरव : कासारवाडी येथील श्री छत्रपती शाहू महाराज महापालिका शाळा आता जुन्या ओळखीला मागे टाकत आधुनिकतेचा नवा आदर्श ठरत आहे. एकेकाळी मंदिराच्या व पोस्टाच्या खोल्यांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता पाच मजली, सुसज्ज इमारतीत शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
४४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेला माजी आमदार अण्णासाहेब मगर यांनी संरक्षण खात्याकडून दोन एकर जागा मिळवून दिली होती. त्यावर उभ्या केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या शाळेची जागा आता भव्य शैक्षणिक संकुलात रूपांतरित झाली आहे. माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या प्रयत्नातून जुन्या इमारतीचे पुनर्बांधणी काम हाती घेण्यात आले.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या शाळेत २४ वर्ग खोल्या, अँडिटोरीयम, वाचनालय, स्वतंत्र चित्रकला, नृत्य, हस्तकला हॉल, तसेच संगणक व विज्ञान विषयांच्या प्रयोगशाळा आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, आग प्रतिबंधक यंत्रणा, स्वच्छ शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या इमारतीची रचना विद्यार्थी-केंद्रित असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी आहे. परिसरात माता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या पुतळ्यांच्या माध्यमातून प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले आहे. सुमारे २ कोटी २५ लाखांच्या खर्चातून साकारलेली ही शाळा भविष्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मानदंड ठरणार आहे, असा विश्वास स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शाळेच्या सुसज्ज इमारतीमधून सर्व सामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता येणार आहे. महापालिकेच्या अशा अत्याधुनिक इमारती साकारणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह निर्माण करण्यासारखे आहे. इतर इमारतही पालिकेच्या शाळा अशा सुसज्ज करण्याचा प्रयत्न राहील. गरिबातील गरीब लोकांना चांगल्या शाळा व चांगले ज्ञान मिळणार आहे.
– सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय





