पिंपरी – शहरामध्ये दुपारी उन, सायंकाळी पाऊस तर पहाटे थंडी असे वातावरण अनुभवयाला मिळत आहे. हवामानातील तीव्र चढ-उतारांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. दिवसा दमट हवामान व रात्री गारठा जाणवत असल्याने ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव आदी संसर्गजन्य आजारांनी अनेक नागरिकांना घेरले आहे. बदलत्या हवामानाबरोबरच दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेल्या मोठ्या गर्दीमुळे एकमेकांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक झपाट्याने वाढले आहे. सध्या थंडी आणि पाऊस असल्याने संसर्गजन्य आजारांत वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयासह शहरातील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), थेरगाव, आकुर्डी, भोसरी आणि जिजामाता रुग्णालयामध्ये व्हायरलमुळे झालेल्या आजाराच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. मनपाच्या रुग्णालयात आठवडाभरात दहा हजारांहून अधिक रुग्ण तर, खासगी दवाखान्यांत देखील हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामकाजासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रोज सरासरी ३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यापैकी अंदाजे ५५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप आणि दम लागत असल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. त्यांच्या छातीत कफ झाल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे या आजाराचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांकडे देखील मोठी गर्दी पाहयला मिळत आहे. प्राथमिक लक्षणांकडे अनेक जण दुर्लक्ष करत असल्याने काही रुग्णांमध्ये संसर्ग वाढत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी बदलत्या हवामानामध्ये काळजी घ्यावी. तसेच सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयामधून तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकार्यांनी केले आहे. बालरोग तज्ज्ञांकडेही गर्दी वातावरणात झालेल्या बदलांमुळे बालकांना घशात प्रचंड खवखव, डोळ्यात पाणी आणि डोकेदुखी असे त्रास होत आहेत. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये असलेल्या बालरुग्ण विभागामध्ये गर्दी वाढली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. बाहेरून घरात आल्यानंतर प्रत्येकाने जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ताप, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नागरिकांनी मास्क वापरावे. बाजारपेठांत दिवाळी निमित्ताने खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून, सामाजिक अंतर आणि मास्क वापराचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.