Pimpri : सात महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत ६२४ कोटींचा भरणा

मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाचे प्रयत्न
७ लाख ४० हजार मिळकतींची नोंद : ४ लाख ७८ हजार मिळकतधारकांनी भरला कर
पिंपरी – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पहिल्या सात महिन्यांत ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्षात नागरिकांचा वाढता प्रतिसाद, विभागाचे नियोजनबद्ध कामकाज आणि विविध सवलतींचा लाभ या सर्व घटकांमुळे कर संकलनात वाढ झाली आहे. शहरात सध्या एकूण ७ लाख ४० हजार मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी ४ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कर भरणा केला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात कर वसुलीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या काळात ५४२ कोटी ६० लाख रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. त्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांत म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ६२४ कोटी ८५ लाख रुपये म्हणजेच तब्बल ८२ कोटी २५ लाख रुपयांचा मालमत्ता कर अधिक वसूल झाला आहे.
पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत नागरिकांनी कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून विभागाने विविध सवलती जाहीर करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक करदात्यांनी ऑनलाईन पर्यायांचा वापर करून घरबसल्या कराचा भरणा केला, तर काहींनी महापालिकेच्या खात्यावर थेट कराचा भरणा केला.
ऑनलाइन कर भरण्यास प्राधान्य
शहरातील नागरिक ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरण्यास प्राधान्य देत आहेत. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत ४ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला असून, त्यापैकी ३ लाख ९१ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरला आहे. ऑनलाइन कर भरण्यात आलेली रक्कम ही ४९६ कोटी रुपये आहे.
कर संकलन व कर आकारणी विभागाच्या नियोजनबद्ध कामकाज, डिजिटल सुविधा आणि जनजागृती मोहिमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे. पुढील काळात ही गती कायम ठेवत करदात्यांना अधिक सुलभ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
— पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका





