Pimpri : पाणीपुरवठा विभागाकडून ४२ विद्युत मोटारी जप्त

पिंपरी : शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाणी टंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका पाणीपुरवठा विभागाने विद्यूत मोटारीने पाणी खेचणार्यांवर कारवाई तीव्र केली आहे. शहरात गुरुवारी (दि. १७) वेगवेगळ्या भागात कारवाई करून ४२ विद्यूत मोटारी पाणीपुरवठा विभागाने जप्त केल्या आहेत.
सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढलेली आहे. या स्थितीत पाणी वापरावर नियंत्रण आणून सर्व नागरिकांपर्यंत पाणी पोहचविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शहरात वाढलेला बेकायदा पाणी वापर कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका शहरात तपासणी करणे, विद्यूत मोटारी जप्त करणे, बेकायदा नळजो़डांवर कारवाई करणे आणि अधिकाधिक नळजोड अधिकृत करण्यासाठी मोहीम राबवित आहे.
त्याचाच भाग म्हणून चिंचवड बळवंतनगर शिवनगरी भागात २१ विद्युत पंप, रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले ११ विद्युत पंप, चिखली मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी भागात १० विद्युत पंप जप्त करण्यात आले.
पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी अनेक भागातून प्राप्त होतात. त्यामुळे विद्यूत मोटारी लावून पाणी खेचणार्यांवर महापालिकेकडून कारवाई सुरु आहे. नागरिकांनी मोटारी वापरू नयेत. तसेच, पाणी बचत करावी.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका





