Pimpri : शहरात आतापर्यंत जीबीएसचे १२ रुग्ण

पिंपरी : एक लाखामध्ये एकास होणारा गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या आजाराने पिंपरी-चिंचवड शहरात देखील पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत या आजाराचे १२ रुग्ण आढळले आहेत.
पूर्वी जीबीएसचे एक किंवा दोन रुग्ण असायचे परंतु गेल्या काही दिवसांमध्ये शहरात बारा रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी सहा रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर अन्य सहा रुग्णांवर महापालिकेच्या दवाखान्यासह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षमण गोफणे यांनी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात आदित्य बिर्ला रु्णालयात एका महिला रुग्णाला या आजराची लागण झाल्याचे समोर आले होते. रुग्णालयाने या महिलेवर यशस्वी उपचार केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. आदित्य बिर्ला रुग्णालयाचे डाॅ. परेश बाबेल यांनी सांगितले की, या आजारामध्ये बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात करते. या आजाराच्या काही रूग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येतात.
रुग्ण बरा होण्यास १५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. यात प्रामुख्याने इम्युन ग्लोबिन पद्धतीने उपचार केला जातो. ही उपचार पद्धती उपलब्ध असल्याने अधिक चिंतेचे कारण नाही. पुण्यामध्ये एकाच भागात अनेक रुग्ण आढळले असल्याने याबाबत तपास सुरु आहे. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले रुग्ण एकाच भागातील नाहीत. पाण्यात एक विशिष्ट प्रकारचा जंतू असल्यास पोटाचे विकार होतात, प्रामुख्याने उलट्या जुलाब होऊन त्यानंतर या आजाराची लागण होण्याची शक्यता वाढते.
शंभर वर्ष जुना आजार
या आजाराचा शोध साधरणत: शंभर वर्षांपूर्वी लागला होता. फ्रान्सचे डाॅक्टर गुइलेन आणि बॅरे यांच्या नावावरुन या आजाराचे नाव ठेवण्यात आले आहे. 1916 मध्ये दोन सैनिकांना लकवा झाला होता, त्यानंतर ते बरे झाले होते. तेव्हापासून या आजारावर अभ्यासास सुरुवात झाली आहे.
या आजाराची सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे
-हातापायातील ताकद कमी होणे.
-हातापायाला मुंग्या येणे.
-गिळण्यास व बोलणेस त्रास होणे.
-धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे.
महापालिका प्रशासनानच्या वतीने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आवाहन करण्यात आले आहे की, या आजाराचे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या वैद्यकीय विभागास त्वरित कळविण्यात यावे, जेणेकरून रुग्णांचे एकाच भागामधील क्लस्टरमध्ये आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोयीस्कर होईल.
6 रुग्णांना उपचार पूर्ण होऊन बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलेले आहे व उर्वरित 6 रुग्ण दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना आवाहन आहे कि, हा आजार हा नवीन नसून यापूर्वीही या आजाराचे रुग्ण काही प्रमाणात आढळून आलेले आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नये परंतु उपरोक्त नमुद लक्षणे आढळून आल्यास त्वरित मनपाच्या नजीकच्या रुग्णालयात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या आजारावर आवश्यक असणारे औषधोपचार महापालिकेकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.
– डाॅ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पिंपरी-चिंचवड महापालिकागुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे, याचे निदान गुंतागुंतीचे असते. आम्ही काही दिवसांपूर्वी एका रुग्णावर उपचार करुन त्याला बरे केले आहे. रुग्णाच्या इतिहासावर आधारित तपासणी, न्यूरोलॉजिकल चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या आवश्यक असतात. आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्सचेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. बहुतेक रुग्ण बरे होतात, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यानंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात. वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. आजार दुर्मीळ असला तरी या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प म्हणजे अवघे ३ ते ४ टक्केच आहे. यामुळे रुग्णाने न घाबरता लक्षणे आढळल्यास तातडीने डाॅक्टरांचा संपर्क करावा.
– डॉ. परेश बाबेल, फंक्शनल न्यूरोसर्जरीचे सल्लागार
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल





