Pimpri : ऐन उन्हाळ्यात लिंबानंतर सब्जा बियांच्या दरातही मोठी वाढ

पिंपळे गुरव : उन्हाळ्यात लिंबू सरबत आणि फालूदासारख्या थंड पेयांमध्ये ‘सब्जा’ बिया अनिवार्य मानल्या जातात. शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पचनासाठी उपयुक्त असलेल्या या बियांना फेब्रुवारी ते जून या कालावधीत विशेष मागणी असते. पिंपरी चिंचवड शहरातील किराणा दुकानदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सब्जा बियांचा दर १८० रुपये किलो होता, यावर्षी तो २४० रुपये किलोवर पोचला. सरबतामध्ये सब्जा बिया टाकून देण्याचा आग्रह धरत ग्राहक धरत आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानल्या जाणाऱ्या सब्जा बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे पोषणतत्त्वे असतात. यामुळे हाडे आणि स्नायूंना बळकटी मिळते, तसेच पचनसंस्थाही सुदृढ राहते. काही संशोधनांनुसार, सब्जा बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही या बिया उपयुक्त ठरतात.
पोषणमूल्य असल्याने सुपरफूड
सब्जा बिया काळ्या तिळासारख्या दिसतात. या बिया ओसीमम बॅसिलिकम या गोड तुळशीच्या प्रजातीपासून मिळतात. भारतात त्यांचा उपयोग प्रामुख्याने थंड पेयांमध्ये केला जातो. पण, आता या बियांचा उपयोग आंतरराष्ट्रीय खाद्य उद्योगातही वाढू लागला आहे. पोषणमूल्य आणि थंडाव्याच्या गुणधर्मांमुळे त्या ‘सुपरफूड’ म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
उन्हाळा सुरू झाल्यापासून लिंबाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एरव्ही एक किंवा दोन रुपयांना मिळणारे लिंबू आकारानुसार आता सात ते दहा रुपयांना मिळत आहे. त्यामुळे अनेक हॉटेलमधून नाष्टा किंवा जेवणाच्या वेळी देण्यात येणारे लिंबू गायब झाले आहे. लिंबानंतर आता सब्जा बियांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू सरबत विक्रेते हवालदिल झाले आहेत.
सध्या पिंपरी चिंचवड शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. त्यामुळे लिंबू सरबत, फालुद्याला पसंती मिळत असून, ग्राहक त्यात खास करून उन्हाळ्यात सब्जा बियांना चांगली मागणी असते. लिंबू सरबत, फालुद्यामध्ये त्या वापरल्या जातात. थंड असल्यामुळे ग्राहक आवर्जून त्या टाकायला सांगतात. ज्यांना याची माहिती असते, ते घरीसुद्धा नेण्यासाठी घेतात.
– राजेश पांडे, थंडपेय विक्रेता





