satara | पिंपोडे बुद्रुक येथील खुनाचे रहस्य कायम

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी)- पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे नऊ दिवसापूर्वी २४ वर्षीय युवकाचा डोक्यात आणि तोंडावर अज्ञाताने खलबत्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. मात्र, खुन्याचा अद्याप मागमूस वा तपास न लागल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथे शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या भगवान मच्छिंद्र सपकाळ (वय २४) याचा अज्ञाताने खलबत्त्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना दि.१६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे सहकाऱ्यांसोबत तसेच काही वेळात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक एम. डी. शिंदे घटनास्थळी आले. तपास सुरु झाला.
फॉरेन्सिक लॅब ठसा तज्ज्ञ, श्वान पथक तैनात केले. काही अंतरावर श्वान पथक घुटमळले. आणि पुढील तपास अनेक प्रकारच्या शक्यतेने सुरु झाला. मृत भगवानचा मोबाइल आढळला नव्हता. तांत्रिक बाबींच्या सहाय्याने तपास करण्यात आला, मात्र, पोलीसांच्या हाती ठोस असे काहीच लागले नाही.
पोलिसांनी खुनाच्या दिवसापासून छडा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप घटनेतील मारेकरी वा घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही. अजून तरी निश्चित धागेदोरे सापडत नाहीत. पोलीसांचे पथक सर्व बाजूने कसून तपास करीत आहेत. तरीही खुनाचे रहस्य वाढत चालले आहे, अशी चर्चा पंचक्रोशीतील लोकांमध्ये सुरु आहे.





