Pimpri : पिंपळे सौदागरचा जुना उड्डाणपूल बंद

पिंपरी : पिंपळे सौदागरमधून पिंपरी गावात जाण्यासाठी पवना नदीपात्रावर बांधलेल्या जुन्या उड्डाण पुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे या पुलावरुन होणारी वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागर आणि पिंपरी गाव या दोन्ही परिसरांना जोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पवना नदीपात्रावर उड्डाण पूल बांधला. त्याला अनेक वर्ष होऊन गेल्यानंतर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला. हिंजवडी आयटी पार्कचा विस्तार झाल्यानंतर नोकरीनिमित्त आयटी पार्कमध्ये जाण्यासाठी आणि पुन्हा परत पुणे- मुंबई महामार्गावर येण्यासाठी याच मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे पुलावरील वाहतूक वाढल्याने पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला.
वाहनांची संख्या वाढल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत होती. वाहनांची वाढती संख्या आणि जुन्या पुलावर येणारा ताण विचारात घेऊन महापालिकेने या पुलाच्या बाजुला दुसरा नवीन समांतर पूल बांधला. सध्या जुन्या पुलावरील सर्व वाहतूक नवीन पुलावर वाळविण्यात आली आहे.
त्यामुळे जुन्या पुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या पुलाचे आयुर्माण वाढविण्यासाठी जॅकच्या सहायाने पुलाचा काही भाग उचलून त्याठिकाणी बेरिंग बसवण्यात येणार आहेत. या कामासाठी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती स्थापत्य प्रकल्प विभागाकडून देण्यात आली.





