पिंपरखेडचा स्वरूप ‘नासा’च्या भेटीला, परिसरातून कौतुकाचा वर्षाव

जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीत शिकणारा स्वरूप सचिन बराटे याची अमेरिकेतील ‘नासा’ आणि भारतातील ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन केंद्रांच्या भेटीसाठी निवड झाली आहे. स्वरूपच्या या यशाबद्दल परिसरातून त्याचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत ‘आयुका’ या संस्थेच्या मार्गदर्शनाने तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १६,१२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी १३,६७१ विद्यार्थ्यांनी पहिली ऑनलाइन परीक्षा, तर १,५४१ विद्यार्थ्यांनी दुसरी ऑनलाइन परीक्षा दिली. या प्रक्रियेतून २३५ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले. अखेरीस पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून केवळ २५ विद्यार्थ्यांची ‘नासा’ आणि ‘इस्रो’ भेटीसाठी निवड झाली, त्यात स्वरूपचा समावेश आहे.
पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या स्वरूपचे वडील सचिन बराटे आणि आई सुशिता बराटे हे दोघेही शिक्षक आहेत. स्वरूपला या यशासाठी मुख्याध्यापक पी. सी. बारहाते आणि शिक्षक पोपट भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. स्वरूपच्या या यशाने गावासह संपूर्ण शिरूर तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.

