Pimpari Chinchwad : चिंचवडमध्ये झाड कोसळल्याने पीएमपीएल बसचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

चिंचवड : जुना पुणे-मुंबई महामार्गावरील काळभोर नगर परिसरात बुधवारी (दि. २) दुपारी एक मोठे झाड अचानक पीएमपीएल बसवर कोसळले. बसमध्ये प्रवासी असतानाही सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. आकुर्डीहून चिंचवडकडे जाणाऱ्या या बसच्या छतावर झाड पडल्याने बसचे किरकोळ नुकसान झाले.
झाड मोठे असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि झाडाचा मुख्य भाग बसच्या मध्यभागी न पडल्याने मोठा अनर्थ टळला.सध्या या परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून, खोदकामामुळे झाडांच्या मुळांची पकड सैल झाल्याने ही घटना घडल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाड हटवले आणि वाहतूक सुरळीत केली. स्थानिकांनी मेट्रोच्या खोदकामामुळे वृक्षांना धोका निर्माण झाल्याचे सांगत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.





