पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खुनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी चैताली भोईर हिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचा या खुनात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नकुल आनंदा भोईर (वय ४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्यांची पत्नी चैत्राली हिने आपण एकटीने केल्याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपी सिद्धार्थ आणि चैत्राली यांच्या अनैतिक संबंधाच्या आड नकुल येत असल्याने त्या दोघांनीही नकुलचा काटा काढण्याचे ठरविले. नकुलने चैत्रालीला केलेली मारहाण सहन न झाल्याने सिद्धार्थ याने रागाच्या भरात नकुलचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले.ज्या ओढणीने नकुल यांचा गळा आवळला ती ओढणी सिद्धार्थ हा जाळून टाकणार होता. कारण त्या ओढणीला नकुल याचा घाम होता. परंतु ती ओढणी चैत्रालीने लपवून ठेवली. आता तीच ओढणी जप्त करण्यासाठी चैत्राली हिला पोलीस कोठडी सुनावली. आरोपी सिद्धार्थ आणि चैत्राली हे कुठे-कुठे गेले याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.