Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील (२८ जानेवारी) मृत्यूनंतर आता पायलटच्या पार्श्वभूमीवरून नवे खुलासे समोर येत आहेत. विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाण रेकॉर्ड वादग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. १५,००० तासांच्या अनुभवासह असले तरी, त्यांच्या भूतकाळात दारू प्रकरण आणि सुरक्षा नियम उल्लंघनाचे अनेक आरोप आहेत. या माहितीने अपघाताच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, कंपनीच्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन सुमित कपूर यांना यापूर्वी दोनदा ड्यूटीवर दारू प्रकरणात पकडण्यात आले होते. १३ मार्च २०१० मध्ये दिल्ली ते बंगळुरू उड्डाणापूर्वी ते दारूच्या नशेत आढळले. तसेच ७ एप्रिल २०१७ मध्ये दिल्ली ते गुवाहाटी उड्डाणापूर्वी ‘अल्कोहोल पॉझिटिव्ह’ चाचणी आली. दुसऱ्या प्रकरणानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले होते. ही शिक्षा वैमानिकांसाठी अत्यंत कठोर मानली जाते. निलंबन काळ संपल्यानंतर कपूर यांनी ‘VSR व्हेंचर्स’ या खासगी कंपनीत प्रवेश केला. ही कंपनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या विमान प्रवासाची जबाबदारी हाताळते. मात्र, कंपनीने कपूर यांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी केली का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. अपघाताच्या तपासात हे मुद्दे केंद्रस्थानी असून, DGCA आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यात येत असताना हा अपघात घडला. पायलटच्या वादग्रस्त इतिहासाने अपघाताच्या कारणांवर नवे प्रश्न निर्माण झाले असून, विमान सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण राज्य शोकाकुल असून, आज बारामतीत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.