जबलपूर : भाजपच्या खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्या इमर्जन्सी या चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर उद्या (सोमवार) मध्यप्रदेश उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. इमर्जन्सी चित्रपटात कंगना या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. तो चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगितले जाते. अद्याप सेन्सॉर बोर्डाने त्या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवलेला नाही. अशात त्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका एका शीख संघटनेने दाखल केली आहे. संबंधित चित्रपट शीख समुदायाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. तो चित्रपट समाजहितासाठी हानिकारक ठरू शकतो, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपमधील शीख नेत्यांचाही कंगना यांच्या चित्रपटाला विरोध असल्याचे संकेत मिळत आहेत. कंगना या आता जनतेतून निवडून आलेल्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील शीख समुदायानेही त्यांना मतदान केले असणार. त्यामुळे त्यांनी समंजस कृती करायला हवी, अशी भूमिका त्या नेत्यांकडून मांडली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.