राजगुरूनगर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण सुरू आहे;मात्र सरकारकडून या आमरण उपोषणाची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी एसटी बसेसवरील सरकारच्या जाहिरातीमधील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. राजगुरुनगर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 25 दिवस बेमुदत साखळी उपोषण खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. मनोज जरांगे यांनी सरकारला निर्णय घ्यायला 40 दिवसांचा वेळ दिला मात्र सरकारने मराठा आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी राजगुरूनगर येथे अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, विकास ठाकूर, अजय स्वामी या चार युवकांनी चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र या उपोषणाची सरकारकडून आतापर्यंत दखल घेण्यात आली नाही. याचा निषेध म्हणूनदरम्यान, रविवारी (दि. 29) सायंकाळी खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या युवकांनी एकत्र येत सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी राजगुरूनगर एसटी आगारातील बसेसवर विविध जाहिरातीमध्ये असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेत्यांच्या फोटोला काळे फासले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.