मुंबई – रकुल प्रित सिंहने आपल्या “छतरीवाली’ या सिनेमाचे शूटिंग संपवले आहे. या कॉमेडी ड्रामामध्ये रकुल एक कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर सेटवर जो जल्लोष झाला त्याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कालचा दिवस आनंदाने भरलेली एक बॅग होती. मी या शूटिंगच्यावेळी खूप मस्ती केली आणि त्याचा खूप आनंददेखील घेतला, असे रकुलने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. “छतरीवाली”मधील रोल रकुलसाठी पहिला लीड रोल होता. त्याबद्दल काही सांगितले जाऊ शकत नाही, असेही तिने म्हटले आहे. करनालच्या छोट्या गावात राहणारी एक मुलगी नोकरी मिळवण्यासाठी खूप आतूर झाली आहे. तिला मिळते ती नोकरी एका कंडोम फॅक्टरीमध्ये टेस्टिंग करण्याची असते. समाजातील परस्पर भिन्नतेवर उपहासात्मक टीका करण्याचे काम “छतरीवाली’मधून केले गेलेले आहे. कंडोमच्या वापराबद्दल लोकांमध्ये एक संकोचाची भावना असते. हा संकोच दूर करण्याचे काम या सिनेमातून केले गेलेले आहे. आता तर सिनेमाचे शूटिंग संपले आहे. मात्र अजून हा सिनेमा कधी रिलीज केला जाणार आहे, हे स्पष्ट केले गेलेले नाही.