Phone Pe : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! फोनपे कंपनी आयपीओ काढण्याच्या तयारीत

मुंबई : भारतातील सर्वात फिनटेक कंपनी असलेल्या फोनपेने आयपीओ म्हणजे प्रार्थमिक संमभाग विक्री करण्याचे ठरविले असून यासाठी या कंपनीने जोरदार तयारी चालू केली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी या कंपनीने आयपीओ काढण्यासाठी संबंधित बँकांची नियुक्ती केली आहे. वॉलमार्टच्या अधिपत्याखालील या कंपनीने सध्याच्या कामकाजासाठी गेल्या वर्षी 7,021 कोटी रुपयांचे भांडवल उभारले. आता ही कंपनी भांडवल बाजारातून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
यासंदर्भात वृत्तसंस्थांनी फोन पे कंपनीकडे विचारणा केले असता त्या संबंधात प्रतिक्रिया देण्यास कंपनीने असमर्थता दर्शविली. फोनपे कंपनीची स्थापना 2016 मध्ये झाली होती. आतापर्यंत या कंपनीने 18,000 कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली आहे. या कंपनीच्या अॅपचा देशातील 61 कोटी नागरिक वापर करतात. तर चार कोटी व्यापारी या व्यासपीठाचा वापर करून डिजिटल व्यवहार करीत आहेत.
मे 2025 च्या आकडेवारीनुसार फोनपे कंपनीने दैनंदिन 34 कोटी व्यवहाराचा टप्पा गाठला आहे. तर 150 लाख कोटी रुपयाचे व्यवहार या व्यासपीठावरून झाले आहेत. 2023-24 मध्ये कंपनीला 197 कोटी रुपयांचा नफा मिळविण्यात यश मिळाले आहे. त्या अगोदरच्या वर्षात कंपनीला 738 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र आता कंपनीची परिस्थिती सुधारली असल्यामुळे आयपीओ काढला जात आहे.





