अरे देवा! मंदिराच्या दानपेटीत पडला आयफोन, पुढे जे झाले ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Devotee Accidentally Drops IPhone in Donation Box: मंदिरात देवदर्शनाला गेल्यावर प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार दानपेटीत काहीना काही टाकत असते. काहीजण पैसे टाकतात, तर काहीजण सोने-चांदी देखील टाकतात. मात्र, मंदिराच्या दानपेटीत हजारो रुपयांचा आयफोन पडला तर? असाच काहीसा प्रकार तामिळनाडूच्या थिरुपुरुर येथे एका भक्तासोबत घडला आहे.
हा भक्त मंदिरात देवदर्शनाला तर गेला, मात्र चुकीने आयफोनच दानपेटीत पडला. दानपेटीत पडलेला आयफोन परत देण्याची मागणी देखील या व्यक्तीने मंदिर प्रशासनाकडे केली. मात्र, मंदिर प्रशासनाने ही आता मंदिराची संपत्ती असल्याचे सांगत चक्क आयफोन परत देण्यास नकार दिला आहे.
चेन्नईच्या थिरुपुरुर येथील अरुलमिगु कंदस्वामी मंदिरात दिनेश नावाची व्यक्ती देवदर्शनाला गेली होती. यावेळी मंदिराच्या दानपेटी पैसे टाकण्यासाठी त्यांनी खिशामध्ये हात घातला. यावेळी पैसे काढताना आयफोनच थेट दानपेटीत पडला. त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली व आयफोन परत देण्याची विनंती केली. मात्र, मंदिर प्रशासनाने दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू मंदिराची संपत्ती असते, असे म्हणत आयफोन परत देण्यास नकार दिला.
मंदिर प्रशासानाने फोन परत देण्यास नकार दिला असला तरीही त्यातील सिम कार्ड व डेटा काढून घेण्याची परवानगी मात्र त्यांना दिली. दिनेश यांनी याबाबतची तक्रार Hindu Religious and Charitable Endowments च्या अधिकाऱ्यांकडे देखील केली. मात्र, परंपरेनुसार दानपेटी दोन महिन्यातून केवळ एकदाच उघडण्यात येते.
मंदिराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली की, दानपेटीतील प्रत्येक वस्तू मंदिराची संपत्ती असते. त्यामुळे फोनला मंदिराकडेच ठेवले जाईल. दिनेश यांनी दान म्हणून फोन पेटीत टाकला व नंतर त्यांचा विचार बदलला का हे स्पष्ट झालेले नाही.





