नॅशनल मेडिकल कमिशनला फिलीपाइन्सची ‘बाधा’; वैद्यकीय शिक्षणाच्या धोरणात विसंगती

पुणे – परदेशात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) 18 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला. मात्र, त्यापूर्वी फिलिपाइन्समध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही हा अध्यादेश लागू असल्याचे “एनएमसी’ने म्हटले. त्यामुळे देशातील सुमारे 23 हजार 272 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अध्यादेशानुसार फिलीपाइन्समध्ये “बीएस+एमडी’ या वैद्यकीय शिक्षणाला भारतात अमान्य ठरवण्यात आले आहे. या शिक्षणात विद्यार्थ्यांची इंटर्नशिप गृहीत धरून साडेसात वर्षांचे शिक्षण पूर्ण होत आहे. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध होण्यापूर्वीपर्यंत या शिक्षणाला “एनएमसी’ची मान्यता होती. “एनएमसी’ने अचानक आदेश काढत संबंधित शिक्षणाला अमान्य ठरविण्याची भूमिका घेतली. यामध्ये अध्यादेश पूर्वी 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही नियम लागू केला आहे.
अन्य देशांतील पदवी मान्य, पण फिलीपाइन्समध्ये घेतलेले शिक्षण अमान्य कसे? विद्यार्थ्यांच्या पालकांचा सवाल
या सर्व स्थितीमुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांबाबत अन्याय होत आहे. या स्थितीबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत अध्यादेशातील जाचक नियमावलीतून सूट मिळावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. भारतात प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक तसेच प्रवेशाच्या तीव्र स्पर्धेमुळे एमबीबीएसचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी फिलीपाइन्समध्ये कमी शुल्कात “बीएस+एमडी’ शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
त्यानंतर मात्र “एनएमसी’ने या पदवीला अमान्य ठरवले आहे. पण, शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर दीड वर्षांची इंटर्नशिप करावी लागणार आहे. त्याचवेळी “एनएमसी’ने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आदी देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. युक्रेनच्या विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणासाठी परवानगी दिली. मात्र, फिलीपाइन्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतच दुजाभाव का, असा प्रश्न 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.





