औषधी, कापड, वाहन क्षेत्राचे घसरले निर्देशांक; अमेरिकेने 25% आयात शुल्क आणि दंड लावल्याचा परिणाम

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्या वस्तूवर सरसकट पंचवीस टक्के आयात शुल्क लावले आहे. त्याचबरोबर रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल दंड लावणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे अमेरिकेला जास्त प्रमाणात निर्यात करणार्या कापड, औषधी, वाहन, माहिती तंत्रज्ञान आणि तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
कापड व तयार कपड्याच्या क्षेत्रातील पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज, गोकलदास एक्सपोर्ट्स, अरविंद, वर्धमान टेक्सटाईल्स, के पी आर मिल, अलोक इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 2.51 ते 7.32 टक्क्यांनी घट झाली.औषधी क्षेत्रातील जुबलियंट फार्मा, लुपिन, सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, आरपीजी लाइफ सायन्सेस, सिप्ला या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 0.58 ते 3.65 टक्क्यांनी घट झाली.वाहन क्षेत्रातील फोर्स मोटर्स, बजाज ऑटो, अशोक लेलँड, टाटा मोटर्स, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील वाहन क्षेत्राचा निर्देशांक 0.35 टक्क्यांनी कमी झाला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 1.26 टक्क्यापर्यंत घट झाली. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 0.63 टक्क्यांनी कमी होऊन 34,808 अंकावर बंद झाला.ईवाय इंडिया या कंपनीचे तंत्रज्ञान विषयक अधिकारी नितिन भट यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर अमेरिकेच्या आयात शुल्काचा जास्त परिणाम होणार नाही. मात्र अमेरिकेने भारताविरोधात भूमिका घेतल्यामुळे अमेरिकन कंपन्या भारतातून होणार्या आयातीवर मर्यादा आणू शकतात. त्याचबरोबर भारत पुन्हा अमेरिकन कंपन्यावर डिजिटल टॅक्स लावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावावर परिणाम झाला.
मुख्य निर्देशांकात घट
सकाळी शेअर बाजारात नकारात्मक वातावरण होते. मात्र नंतर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही काळ निर्देशांक कालच्या तुलनेत वाढले होते. मात्र बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 296 अंकांनी कमी होऊन 81,185 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी म्हणजे 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24,7008 अंकावर बंद झाला.





