प्रभात वृत्तसेवा फलटण : शरयु अॅग्रो इंडस्ट्रिज लि. चालू गळीत हंगामासाठी उच्चांकी असा 3400 रुपये ऊस दर देणार असल्याशी घोषणा कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांनी केली आहे.पहिली उचल 3200 रु प्रति टनाप्रमाणे देण्यात येणार असून उर्वरित 200 रुपये दिवाळी सणापूर्वी बळीराजाच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील. सोलापूर व सांगली या दूरच्या भागातून येणार्या गेटकेन ऊसालाही पहिली उचल 3200 रुपये दिली जाणार असून दिवाळी सणापूर्वी त्यांनाही विनाकपात 100 रुपये देऊन एकूण 3300 रुपये दर दिला जाणार आहे.पहिल्या पंधरवड्यात आलेल्या संपूर्ण ऊसाचे बिल पुढील दोन दिवसात शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. शरयुने अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्व शेतकर्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.फलटण, वाई, खंडाळा, भोर-वेल्हा, पुरंदर, जावली, सातारा, कोरेगाव, माण-खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती आदी भागात ऊस तोडीसाठी योग्य नियोजन करण्यात आले असून यंदा मुबलक तोडणी यंत्रणा व पंधरा अत्याधुनिक हार्वेस्टर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवानी घाई गडबड न करता थांबून आपला संपूर्ण परिपक्व ऊस शरयुला गाळपासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे.