फलटण : महाशिवरात्रीनिमित्त फलटण शहर व परिसरात विविध ठिकाणी असणाऱ्या शंभू महादेवाच्या मंदिरात तसेच ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने गुहा बनवून त्यामध्ये बनवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महाशिवरात्रीनिमित्त अनेकांनी सकाळपासूनच उपवास करून विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
महादेवाचे दर्शन घेवून मनोकामना केली. महादेव मंदिरात जावून पहाटेपासूनच रूद्राभिषेक, होमहवन, पालकी मिरवणूक, आदी धार्मिक विधी मोठ्या उत्साहात पार पडला. शंभू महादेवाची महापूजा, शिवलिलामृत ग्रंथ ज्ञानेश्वर गाथा, ओम नम: शिवाय जप पठन करण्यात आले.
फलटण शहरातील प्राचीन जबरेश्वर, नागेश्वर, उंबरेश्वर, रामेश्वर, माणकेश्वर, काशीविश्वेश्वर, पुंडलिक महादेव मंदिर, त्रीजटेश्वर मलटन महादेव मंदिर, रंगारी महादेव मंदिर, आदी मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. जबरेश्वर मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. या शिवकालीन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.