phaltan case: दुग्धभिषेक करून घ्यायला हा काय देव आहे का?

फलटण- डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांची वेगळी चौकशी वेगळ्या एसआयटीमार्फत व्हावी, ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे, असे सांगत विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘दुग्धभिषेक करून घ्यायला हा काय देव आहे का?’ अशी टीका माजी खासदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली.
पीडितेने धस याच्याकडे लेखी तक्रार केली होती. धस यांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही, माहितीच्या अधिकारात माहिती मागवली तरीही दिली नाही, आत्महत्याग्रस्त मुलीने आरोप केलेत, त्यात मी मास्टरमाइंड असण्याचा सबंध नाही, असे रामराजे यांनी त्यांच्या फलटण येथील लक्ष्मी विलास निवासस्थानी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण व रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे यांची उपस्थिती होती. आताच्या घटनेत मी कसा मास्टर माईंड, त्या मुलीने दिलेल्या पत्राची तारीख बघा, त्यातून योग्य पद्धतीने लक्ष दिलं असत तर त्यावेळी या धसने पीआय सुनील महाडिक व इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले असते तर ही घटना घडली नसती, असे त्यांनी स्पष्ट केले.
रामराजे म्हणाले, ‘‘राहुल धस यांना कुणी फलटणला आणले, कोणामुळे बदली मुंबईत झाली, तरीही माजी खासदार रणजितसिंह त्यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले व त्यांची बदली पुण्यात करण्यात यावी, अशी मागणी केली. माझ्या माहितीप्रमाणे या माणसाच्या घरी एफआयआर लिहिली जायची, पीडितेची आत्महत्या नैसर्गिक आहे की हत्या हे या तपासात कळेल. म्हणून धस यांची वेगळी चौकशी वेगळ्या एसआयटीमार्फत व्हावी, ही मागणी आहे.’’
फलटणमध्ये चार कारखाने असताना फक्त त्यांच्याच कारखान्याच्या तक्रारी होतात आणि त्या सगळ्या राहुल धस यांच्या काळात होतात याची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. त्यावेळी मी सांगितले होते धस, असं करु नका, बोलून उपयोग काय, आमच्या लोकांच्या तक्रारीच घेत नव्हते. धस पोलिस खात्याला कलंक असल्याचे रामराजे यांनी सांगितले. आमचं सोडा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल का, तत्कालिन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्याला त्याला सांगत होते, आमच्याकडे ये नाहीतर गुन्हा दाखल करण्यात येईल, त्याच्या पापाची फळे भोगावी यांना आता लागली.
फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास देताना तहसीलदार, प्रांत, सगळे अधिकारी सामील असतात. माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आगवणे उपोषणाला बसले होते, त्यावेळी मी फेस केले, दुधाने आंघोळ नाही केली, असा टोला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लगावला. दुग्ध अभिषेक म्हणजे नाटक असून रडण्याच नाटक कशाला करताय, असा टोला रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लगावला.





